जे गवसले, ते दावावे। जे सुचले, ते सांगावे। सुगंधित ते आदरावे । बकुल वा प्राजक्त॥

या वृत्तीप्रमाणे सप्टेंबर 2009 मध्ये अक्षरबंध चळवळीची वाटचाल सुरू झाली. या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जशी जशी अक्षरे गिरवित गेलो तसे मासिक, दिवाळी अंक, प्रकाशन संस्था, प्रतिष्ठान असा प्रवास होत गेला. पाहता-पाहता तपपुरतीची वाटचाल पूर्ण झाली.
सप्टेंबर 2009 मध्ये सुरू झालेली अक्षरबंध मासिकाची वाटचाल थोडी धाडसानेच झाली. मायमराठीच्या प्रांगणात भरपूर साहित्यसंपदा उपलब्ध आहे. त्यात प्रकाशित होणारी विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिके यांची यादी वाढतच जाणारी आहे. तरीही आपली वैविधता जपत अक्षरबंध मासिकाचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात अक्षरबंधचे विविध विशेषांक प्रकाशित झाले आहेत. स्पर्धा परीक्षा, विवाह, तसेच पुस्तक परिचय जनस्थान पुरस्कार विशेषांक, कथा विशेषांक, महिलादिन व स्वातंत्र्यदिन विशेष, पाऊस कविता असे अनेक विशेष हाताळत वाचकांना वैविध्याअनुभूती देण्याचा मनस्वी प्रयत्न केला.
एक तपाहून अधिक कालावधीपासून अक्षरबंधचे मासिक प्रकाशित होत आहे. नामवंत आणि नवोदित लेखकांच्या साहित्याच्या वैचारिकतेतून मासिकामध्ये प्रकाशित होणारे साहित्य वाचकांसाठी मेजवानीच ठरते. मासिकातील अनेक सदरे लोकप्रिय झालेली आहेत. अक्षरबंधने महाराष्ट्राबरोबर बेळगाव, हैदराबाद, गोवा, येथील साहित्यिकांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मासिकाबरोबर दिवाळी अंकाच्या माध्यमातूनही केला आहे.दिवाळी अंकांची राज्यस्तरीय पातळीवर नोंंद घेतली गेली आणि दिवाळी अंकाच्या शिरपेचात राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला. कोरोना काळापासून मासिक डिजिटल स्वरूपात प्रकाशित केले जात आहे. त्यामुळे अक्षरबंधला विदेशातील मराठी साहित्यिक आणि वाचकांचे प्रेम देखील लाभले आहे. या साहित्यचळवळीला आणखी योगदान देण्याच्या हेतूने, नवसाहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने अक्षरबंध प्रकाशन संस्थेची स्थापना झाली. कथा, कविता, प्रवासवर्णन, बालसाहित्य, शैक्षणिक, धार्मिक, चरित्र, व्यक्तिचित्र, वैचारिक, बालनाट्य, एकांकिका अशा प्रकारांत मुशाफिरी करत प्रकाशन संस्थेची 83 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या प्रकाशित साहित्यसंपदेमध्ये नामवंत कवी, लेखकांसह नवोदितांची साहित्यकृतीचा समावेश आहे. अनेक लिहित्या हातांना अक्षरबंधने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अक्षरबंधच्या व्यासपीठावरून अनेक नवोदितांनी मोठी झेप घेत पुढे प्रस्थापित लेखक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. अक्षरबंध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या अनेक साहित्यकृतींना नामांकित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एकूणच साहित्यसेवेचे व्रत अंगीकारून अक्षरबंधने प्रतिष्ठानच्या रूपाने साहित्यविश्वात आपले पाऊल टाकले आहे. अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांमधून साहित्य चळवळ जतन करण्याबरोबरच ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रतिष्ठानतर्फे कथा स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेला महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतील कथाकारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. तसेच वाचक अभिरुचीवर संस्कार करणार्या दिवाळी अंकांचा सन्मान करण्याच्या हेतूने दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजनही करण्यात येते. विविध दिवाळी अंक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात. साहित्यक्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने अक्षरबंध प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहेत. साहित्यातील प्रत्येक प्रकारातील एक सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीची निवड करून, त्या साहित्यकृती व त्या लेखकाचा सन्मान करण्याचे कार्य यातून होत आहे.
त्याचबरोबर अक्षरबंध जीवनगौरव व अक्षरबंध साहित्यरत्न हे प्रस्ताव विरहित पुरस्कार देऊन साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या व्यक्तींचा गौरव करण्यात व्हावा, हाच मागे उद्देश. साहित्यसेवेबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांत अक्षरबंधचा मोठा सहभाग असतो. प्रतिष्ठानमार्फत शाळा-महाविद्यालये, वाचनालयांना मोफत पुस्तके भेट देण्याचे उपक्रमही राबविले गेले आहेत. तसेच अनेक अनाथआश्रमांना विविध स्वरूपाची मदत अक्षरबंधतर्फे केली जाते. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी वाचन प्रेरणा दिनी संस्थेला भेट देणार्या प्रत्येकाला मोफत पुस्तक देऊन एक आगळी वेगळी संकल्पना प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात आली होती. तसेच भविष्यात अनेक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या अक्षर प्रवासात खूप काही शिकायला मिळाले...या प्रवासाने अनुभव समृद्ध केले... हा प्रवास आणखी जसा पुढे सरकेल, अनवट वाटेने मार्गक्रमण करेल, तसे आपण सारेच या अक्षय्य आनंदात राहून निघू... तूर्तास या अक्षर प्रवासात आजवर मिळालेला सुगंध परस्परांत वाटून घेत गंधित होऊया... तपपूर्ती नंतरही आमची ओंजळ रितीच आहे... ती तुम्हा सर्वांच्या अक्षर प्रेमाने अन् अक्षरदानानेच भरेल... या अक्षर प्रवासात आजवर साथ - संगत करणार्या सर्व स्नेहीजनांचे आम्ही सदैव ऋणी आहोत...

धन्यवाद
अक्षरबंध